हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyay Yatra) मोहिमेवर आहेत. अशातच त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कुत्र्याचे बिस्किट देताना दिसत आहेत. यावरूनच भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनीही देखील राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
नुकत्याच भारत जोडो न्याय यात्रेने आपल्या X अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधींना भेटण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. तर राहुल गांधींच्या गाडीच्या टपावर एक कुत्रा बसलेला दिसत आहे. या कुत्र्याला भरवण्यासाठी त्यांनी बिस्कीटचा पुडा मागितला. यावेळी इतर कार्यकर्ते त्यांचे फोटो काढत होते, तसेच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, राहुल गांधी कुत्र्याला बिस्कीट भरवण्यात दंग होते. त्यांनी या कुत्र्याला बिस्किट साधण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र कुत्र्याने ते बिस्कीट खाल्ले नाही त्यामुळेच आपल्या हातातील बिस्कीट त्यांनी समोर असलेल्या एका कार्यकर्त्याला दिले.
राहुल गांधींचा हाच व्हिडिओ भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर हिमंता बिस्वा सरमा यांनी हा व्हिडिओ शेअर करत “काँग्रेस नेते आपल्या समर्थकांना योग्य वागणूक देत नाही” असा आरोप केला आहे. पुढे त्यांनी म्हटले की, “मी आसामचा एक अभिमानी नागरिक असून, मी ते बिस्किट खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसमधून राजीनामा दिला,” दरम्यान, राहुल गांधींच्या या कृतीमुळे ते चांगलेच वादाच्या भवऱ्यात अडकले आहेत. आता यावर ते स्वतः काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.