सगळे राजकारणी चोर आणि भ्रष्ट आहेत? – राहुल कराड

n
n
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | अजय नेमाने 

‘चौकीदार ही चोर है’ असं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडील काही काळात विरोधी राजकीय पक्षांकडून लक्ष केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘देशातील सगळे राजकारणी चोर आणि भ्रष्ट आहेत का?’ असा प्रश्न एमआयटी विद्यापीठाचे उपाध्यक्ष राहुल कराड यांनी विद्यार्थ्यांना केला. ९ व्या भारतीय छात्र संसदेच्या उदघाटन सत्रातील स्वागतपर भाषणात ते बोलत होते.

भारतीय छात्र संसदेच्या ९ व्या अधिवेशनाचे उद्घाटन आज एमआयटी कोथरूड येथे झाले. यावेळी छात्र संसदेचे अध्यक्ष राहुल कराड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘सगळे राजकारणी भ्रष्ट नसून राजकारणात चांगले लोकसुद्धा आहेत. फक्त गरज आहे ती, शिकलेल्या लोकांनी राजकारणात येण्याची.’ असं म्हणून कराड यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन  केले. ‘छात्र संसद अधिवेशनात भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि बाजारपेठ या देशात आहे’ अशी माहिती कराड यांनी दिली.

‘राजकारणाचे प्रशिक्षण मिळू शकते. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी भारतीय छात्र संसद ही एक मोठी प्रयोगशाळा आहे. राजकारण शिकलेल्या तरुणांनी सुधारले पाहिजे, देशातील संसद भवन आणि प्रत्येक राज्यातील विधानभवन हे लोकशाहीचे मंदिर आहेत. तेथील चार हजार आमदार आणि खासदार यांनी एकत्र आले पाहिजे. जगातील सगळ्यात मोठा लोकशाहीचा महोत्सव झाला पाहिजे. आणि तसा आमचा मानस आहे. त्यासंबंधित पंतप्रधानांशी बोलणी चालू आहे’. असेही कराड यांनी सांगितले.