औरंगाबाद – सिडको पोलिसांनी दोन दिवसापूर्वीच स्पाच्या आडून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच जवाहर नगर पोलिसांनी सुतगिरणी चौकातील स्पाच्या नावाखाली खुलेआम चालणार्या आणखी एका कुंटणखान्यावर काल रात्री छापा टाकून पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक केली तर आंटी फरार असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. स्पाचालक अजय कोळगे, प्रियंका भालेराव आणि कामगार कुणाल गजहंस अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी अजय आणि कुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा सूतगिरणी चौकातील एका इमारतीत क्रिस्टल स्पाच्या नावाखाली कुंटणखाना चालवण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक वसंत शेळके, अजित दगडखैर, कॉन्स्टेबल गोरे, सोनवणे, महिला कर्मचारी हाके, मुळे यांनी एका बनावट ग्राहकाला दोन हजार रुपये देऊन त्या कुंटणखान्यावर पाठवले. तत्पूर्वी त्या नोटांचे नंबर पंचायत समक्ष लिहून ठेवले होते. डमी ग्राहक कुंटणखान्यावर गेल्यानंतर अजयने दोन हजार रुपये घेऊन त्याच्यासमोर तीन मुली उभ्या केल्या. यापैकी एका मुलीसोबत रूम मध्ये जाण्यास सांगितले. डमी ग्राहकाने इशारा करताच पथकाने धाड टाकली. या कारवाईत तेथे ‘धंदा’ करण्यासाठी आणलेल्या तीन मुलींपैकी एक पश्चिम बंगाल मधील रहिवासी व दोघी महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी पंचांसमक्ष पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अजय आणि प्रियंका हे दोघे स्पर्धा चालवतात. त्यांनी त्या मुलींना आमिष दाखवून वेश्याव्यवसायाला संपल्याचे सांगितले.
अजय आणि आंटी प्रियंका भालेराव यांनी भागीदारीत चार खोल्यांमध्ये हा व्यवसाय सुरू केला. विविध ठिकाणांहून आणलेल्या मुलींना पैशाच्या आमिषाने या व्यवसायात ओढल्याचे पोलिसांनी सांगितले. ग्राहकाकडून दोन हजार रुपये घेत होते. एक हजार रुपये मुलींना देत आणि एक हजार रुपये स्वतः घेत असे पोलिसांनी सांगितले. या स्पाची भागीदार प्रियंकाचा पोलीस शोध घेत आहेत.