जुगार अड्डयावर छापा : मलवडी येथे तीन पानी खेळणाऱ्या सरपंचासह 9 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी | माण तालुक्यातील मलवडी येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर धडक कारवाई केली. याप्रकरणी सरपंचासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सरपंच दादासो जगदाळे, संतोष चिरमे, अशोक जाधव, शंकर मदने, गिरीष जाधव, शेखर जाधव, सुर्यकांत बोराटे, दीपक जगताप, जानंदन जाधव (सर्व रा. मलवडी, ता.माण) यांच्यावर गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलवडी येथे गावातील विजय खरात यांच्या जुन्या घराजवळ तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. निलेश देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यालयातील एक पथक व दहिवडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना घेवून संयुक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.

या पथकाने घटनास्थळी जावून धाड टाकली असता संशयित तीन पानी पत्ते पैशावर खेळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असे 3 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी हवालदार तानाजी चंदनशिवे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिस करत आहेत.

Leave a Comment