कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
रेल्वेबाधित शेतकऱ्यांच्या भूसंपादन लढ्यास यश आले आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची, सयापूर, पार्ले, हजारमाची, कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला मिळावा, यासाठी आंदोलन केले. त्यामुळेच शेतकऱ्यांना रेल्वेकडून गुंठ्याला साडेपाच लाखांचा मोबदला देण्यात येत आहे. हा आंदोलनाचाच विजय आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी दिली.
तालुक्यातील बाबरमाची येथील शेतकऱ्यांच्या रेल्वे बाधित क्षेत्राला एक गुंठ्याला साडेपाच लाखांच्या धनादेशाचे वितरण प्रांताधिकारी उत्तम दिघे, श्री. नलवडे, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, मनोज ढाणे, अनिल डुबल, कृष्णा मदने, प्रसाद धोकटे, शंकर आतकरे, अनिल घराळ, योगेश झांबरे, सुनील जाधव या रेल्वे लढ्यातील प्रमुखांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी श्री. नलवडे म्हणाले, “पुणे- मिरज- लोंढा या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विस्तारीकरणाचे काम रेल्वे विभागाने जिल्ह्यात 2018 मध्ये सुरू केले. रेल्वे विस्तारीकरणाचे काम सुरू करताना रेल्वेने शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कोपर्डे हवेली, शिरवडे, टेंभू, संजयनगर व कोरेगाव तालुक्यातील विविध गावांतील कामे, संयुक्त मोजणी बंद पाडली.
कोपर्डे हवेलीत राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे बाधितांचा मेळावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांना सध्या रेल्वेकडून साडेपाच लाखांचा गुंठ्याला मोबदला देण्यात येत आहे. हा शेतकरी आंदोलनाचाच विजय आहे.’
रेल्वे दुहेरीकरणांसाठी 23 गावातील जमीन संपादित काम सुरू ः उत्तम दिघे
पुणे ते मिरज येथे रेल्वेच्या दुहेरीकरणांसाठी 23 गावातील जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांना खासगी वाटाद्वारे जमीन खरेदी घेत आहोत. चालू रेडीरेकनर दराच्या पाचपट पैसे देत आहोत. त्याप्रमाणे सदरचे खरेदीखत चालू असल्याचे कराडचे प्रातांधिकारी उत्तम दिघे यांनी सांगितले.