सातारा | सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दि. 5 ते दि. 8 जुलै दरम्यान ऑरेंज आणि यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. कोयना धरण परिसरात सोमवारी रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या कोयना धरणात 16 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
हवामान खात्याने दि. 5, 6, 7 या दिवशी सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर दि. 8 जुलै रोजी यल्लो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावासह डोंगर दऱ्यातील नागरिकांनी सतर्क बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर कराड, सातारा, वाई, जावली या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे
सातारा जिल्हा घाटमाथा २४ तासातील पाऊस (दि. ५/७/२२, सकाळी ८:३० वाजेपर्यंत)- पाथरपुंज २०३, वळवण १९७, महाबळेश्वर १४६, प्रतापगड १३८, जोर १२१, नवजा १२०