सातारा | सातारा जिल्ह्यात आज गुरूवारी दि. 29 रोजी सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर माण, कोरेगाव, सातारा, खटाव व फलटण तालुक्यातील काही ठिकाणी मध्यम, तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
नवरात्र उत्सव सुरू असून पावसाचाही अंदाज वर्तविला असल्याने दांडिया खेळण्याचा हिरमोड होवू शकतो. आज सकाळपासून फलटण येथील काही भागात तर कराड तालुक्यातील वाघेरी येथे पावसाने सुरूवात केली. सातारा तालुक्यातील भरतगाव व महामार्गावरील अनेक गावात पावसाने मध्यम स्वरूपात सकाळपासून सुरूवात केली आहे. खटाव तालुक्यातील त्रिमली घाटमाथा आणि येळीव येथे पावसाने हजेरी लावली आहे.
सध्या सुरू असलेल्या व पुढे काही दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू शकते. तेव्हा शेतकऱ्यांनी पिकांची योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. तर नवरात्र उत्सवात येणाऱ्या पावसामुळे देवीच्या भक्तांचा हिरमोड होवू शकतो.