सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेलेल वीर धरण आज सकाळी 8 वाजता 100 % भरले आहे. त्यामुळे नीरा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून तो 15 हजार 11 इतका करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 800 क्युसेस व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपत्रात सकाळी सुरू होता. वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी 4 वाजता 4637 क्युसेस विसर्गामध्ये वाढ करून 13 हजार 911 क्युसेस इतका सुरु करण्यात आला आहे. नीरा नदीपत्रात एकूण 15 हजार 11 क्युसेस विसर्ग करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो, याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
कोयना धरणात 75 टीएमसी पाणीसाठा
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा जोर वाढला असून सकाळी 8 वाजता 50 हजार क्युसेस पाण्याची आवक होत होती. त्यात वाढ झाली असून आता 59 हजार क्युसेस प्रतिसेंकद पाण्याची आवक होत आहे. आज दुपारी कोयना धरणातील पाणीसाठा हा 75 टीएमसी इतका झाला आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापन कोणत्याही क्षणी पावसाचे प्रमाण पाहून पाणी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेवू शकते.