कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण 83.50 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 50 हजार 873 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून आज गुरूवारी दि. 11 रोजी दुपारी 3.00 वा. 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सातार जिल्ह्याला झोडपून काढले आहे. तर सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर आहे. गेल्या 24 तासात 4.39 टीएमसी पाणी धरणात वाढले असल्याने धरणात 79. 33 टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे केवळ 20 टक्के पाण्याची धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी गरज आहे.
कोयनेला 192 मिलीमीटर, नवजा 112 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 188 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना नदीपात्रातही पाण्याची पातळी वाढलेली असताना आता धरणातून पाण्याचा 2100 क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.