कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पुढील तीन दिवस हवामाना खात्याने अति पर्जन्यमान होणेची पूर्व सुचना दिली आहे. त्यामुळे उद्या रविवारी दि. 14 रोजी धरणातून 6 वक्र दरवाजे 4 फूट 6 इंचाने उचलून 30 हजार 100 क्युसेस पाणी सोडण्यात येणार असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्याचा फटका सांगली जिल्ह्याला बसणार आहे.
आज दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी संध्या. 5:00 वाजता धरणाची पाणी पातळी 2153 फूट 8 इंच झाली असून धरणामध्ये 92.59 TMC (87.97%) पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात मागील 24 तासात 3. 62 TMC इतकी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत धरणाच्या वक्र दरवाजातून 9 हजार 596 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू झाला. धरण पायथा विद्युत गृहामधून 2100 क्युसेक्स असा एकूण 11 हजार 696 विसर्ग चालू आहे.
उद्या दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 4 फुट 6 इंच उघडून 28 हजार क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 30 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.