सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रहिमतपूर येथील युथ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘सैनिक सद्भावना दौडला’ हजारो युवक -युवतींचा, विद्यार्थी -विद्यार्थ्यांचा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या चैत्रबन परिसरात जवानांच्या हस्ते या सद्भावना दौडचे झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने-कदम, पद्मभूषण वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील माने, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, वासुदेव माने, अविनाश माने, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकुमार माने – पाटील, श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अरुण माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, पंचक्रोशी संस्थेचे सचिव डॉ. एच. एस. कदम, हर्षवर्धन कदम, रहिमतपूर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शिवदास माने, सतीश भोसले , सौ. प्रियंका कदम, दत्तात्रय जाधव यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या सैनिक सद्भावना दौड चा प्रारंभ पंचक्रोशी शिक्षण मंडळ चैत्रबन परिसरात होवून संपूर्ण रहिमतपूर शहरातून ही दौड गांधी मैदानात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम्, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता. प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत होती. या दौडचा सांगता समारंभ हजारो देशवासियांच्या उपस्थितीत गांधी चौकात झाला. यावेळी युथ फाउंडेशनच्या वतीने सौ. चित्रलेखा माने – कदम, सुनील माने यासह विविध मान्यवरांनी जवानांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
सैनिक सदभावना दौडच्या मार्गदर्शिका सौ. चित्रलेखा माने – कदम म्हणाल्या, देशासाठी लढणारे सैनिक देशाचा अभिमान असतात ते असंख्य अडचणींचा सामना करत सीमेवर लढतात शत्रूला रोखतात म्हणून आपण सुरक्षित असतो. त्यांच्या त्यागाचे मोल अतुलनीय असते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देशात विविध उपक्रमांनी, कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर रहिमतपूर युथ फाऊंडेशनने ‘सैनिक सद्भावना दौडचे’ आयोजन करुन देशाविषयी, जवानांच्या प्रती कृतज्ञतेची भावना जपली आहे. यातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळून ते सैन्यदलात सामील होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.