कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण अखेर 100 टक्के भरले असून आज दुपारी 2 वाजता धरणातून 6 वक्र दरवाजे 1 फुट उघडून 9 हजार 463 क्युसेक्स विसर्ग सोडणेत आले आहे. सध्या धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. कराड व पाटण तालुक्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाने शंभरी गाठली आहे.
सध्या पावसाचा जोर मंदावल्याने कोयना व कृष्णा नदीपात्राच्या पाणी पातळीत घट झालेली आहे. गेल्या आठ दिवसात नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठची शेती पाण्याखाली गेलेल्या होत्या. परंतु पावसाचा जोर मंदावल्याने नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाली आहे. तरी आज दुपारी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी सोडण्यात आले आहे.
धरण पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10,513 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनाने केले आहे.