कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणची सैनिक भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे तरूणांचे सैन्यात जाण्याचे स्वप्न धोक्यात असून दिवसेंदिवस त्यांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. अशा इच्छुक युवकांची संधी हिरावू नये यासाठी भारत सरकारने खासबाब म्हणून या वर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंग यांच्यासह रक्षाप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडे केली. खा.पाटील हे लोकसभा अधिवेशनानिमित्त दिल्ली येथे असून त्यांनी यासंदर्भात प्रत्यक्ष भेटून ही मागणी केली आहे.
कोरोना संसर्गामुळे गत वर्षापासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सैनिक भरती प्रक्रियेवरती सुध्दा झाला असून गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रिया झालेली नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया कोल्हापूर येथे घेण्यात येते. विशेषत: सातारा जिल्ह्याला फार मोठी सैनिकी परंपरा असून ती परंपरा आजतागायत सुरू आहे. सातारा जिल्ह्यातून सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. येथील बहुतांशी युवक सैन्यदलात जाण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी ते दोन-दोन वर्षे अगोदर शारीरिक व अन्य परिक्षेची तयारी करत असतात. सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगणारे तरूण त्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत असल्याने त्यांची आलेली संधी हुकत असून त्यांचे स्वप्न धोक्यात येत आहे.
नुकतीच कोल्हापूर येथे होणारी भरती पुन्हा काही काळ स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाल्याने हजारो तरुणांची संधी हुकण्याची शक्यताआहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने या भरती आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आणखीन पुढे लांबण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे सध्या इच्छुक असलेल्या तरुणांची वयोमर्यादा संपण्याची भिती त्यांच्याकडून व त्यांच्या कुटुंबियाकडून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात काही तरुणांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन याविषयीची खंत व्यक्त केली होती.
सदर युवकांचे भविष्य, त्यासाठी ते घेत असलेले परिश्रम व त्यांची संपत चाललेली वयोमर्यादा याची गांभीर्याने दखल घेऊन खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग व रक्षाप्रमुख जनरल बिपीन रावत यांची भेट घेतली. भेटीदरम्यान ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. कोरानामुळे ओढावलेली परिस्थिती व तरूणांची संपुष्टात येणारी वयोमर्यादा लक्षात घेता भारत सरकारने खासबाब म्हणून यावर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.