हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raj And Uddhav Thackeray। पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी तीव्र विरोध केला होता. ५ जुलैला मुंबईत ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चाही होणार होता, परंतु त्यापूर्वीच सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. मात्र तरीही ठाकरे बंधूना एकत्र येण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, कारण सरकारच्या निर्णयानंतर मोर्चा जरी रद्द झाला असला तरी आम्ही ५ जुलैला विजयी मेळावा काढू असं मनसे आणि ठाकरे गटाकडून सातत्याने सांगण्यात येत होत. अखेर आज सामनातून याबाबत स्पष्ट माहिती देत दोन्ही बंधूंचा मेळावा कुठे होणार? त्या ठिकाणाबाबत मोठी घोषणा केली आहे.
काय म्हंटल सामना अग्रलेखात? Raj And Uddhav Thackeray
हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने एल्गार पुकारल्याने सरकारने गुडघे टेकत शासकीय आदेश मागे घेतला. मराठी माणसाच्या एकजुटीचा हा प्रचंड विजय असून 5 जुलैला मराठी विजय दिवस साजरा केला जाणार आहे, असे सामना वृत्तपत्रात म्हंटल आहे. त्यानुसार ठाकरे बंधूंची विजयी सभा वरळी येथील डोम सभागृहात होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj And Uddhav Thackeray) उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये त्यादृष्टीने बैठकाही होत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब,वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, ‘ठाकरे’ या आंदोलनात एकत्र आल्याने 5 जुलैच्या मोर्चात संयुक्त महाराष्ट्र लढ्याची ताकद नक्कीच दिसली असती. या विराट मोर्चाने महाराष्ट्राचा मराठी बाणा देशाने पुन्हा पाहिला असता. तो दिसू नये म्हणून सरकारने हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला. अर्थात, आदेश मागे घेतला तरी 5 जुलैला विजयी शक्तिप्रदर्शन होणारच. आता मराठी एकजुटीची घोडदौड कोणीच रोखू शकणार नाही हे यानिमित्ताने निश्चित झाले आहे. महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा आदेश रद्द करताना ‘त्रिभाषा’ सूत्रावर अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमण्याची घोषणा केली. हा प्रकार बिनबुडाचा, निरर्थक आहे. केंद्र सरकारने लादलेले त्रिभाषा सूत्र महाराष्ट्राने एकदा नाकारल्यावर या समित्यांचे काम काय? या समित्या असे काय दिवे लावणार आहेत? महाराष्ट्राची पहिली भाषा मराठीच राहणार. जगात वावरण्यासाठी इंग्रजी ज्ञानभाषेची आवश्यकता आहेच. आता तिसऱ्या भाषेची सक्ती करण्यापेक्षा ती बाब पालक आणि विद्यार्थ्यांवर सोडून द्यावी. सरकार व त्यांच्या समित्यांनी यात नसती उठाठेव करून घोळात घोळ घालण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठीच होती व त्याच मराठीची भवानी तलवार हाती घेऊन छत्रपतींनी ‘स्वराज्य’ स्थापन केले. शिवरायांची भाषा तीच महाराष्ट्राची भाषा हेच शिक्षणाच्या माध्यमाचे सूत्र असायला हवे, पण भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम राबवून या विषयाचा चुथडाच करायचा आहे असे सामना अग्रलेखातून म्हंटल आहे.