नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात रान उठविणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, आज नाशिकमध्ये होत आहे. राज ठाकरे या सभेत कोणता व्हिडीओ दाखविणार याचीच चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.गोल्फ क्लबवर सायंकाळी सहा वाजता होनार आहे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या सभेत राज ठाकरेंकडून भाजपच्या कामांचा पंचनामाच केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे तयार झालेले वातावरण बिघडू नये यासाठीची धावपळ आता महायुतीने सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या राजगर्जनेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराला आता अवघे दोन दिवस उरले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख नेत्यांच्या नाशिकमधील सभा संपल्या असून, आता केवळ राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात या सभा होत असल्याने त्या परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे शिवसेनेला बळ मिळाले असले, तरी राज ठाकरेंच्या सभेमुळे ते जाऊ नये, अशी धास्ती आता शिवसेना आणि भाजपला सतावत आहे. सुरुवातीला केवळ मोदी आणि शहा यांच्यावर हल्ले करणारे ठाकरे आता शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल करीत आहेत. त्यामुळे नाशिकच्या सभेत फडणवीसही टार्गेट राहण्याची शक्यता आहे.
फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत नाशिक दत्तक घेतले आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांत दत्तक नाशिकची अवस्था बिकट झाली असून, नाशिकचे प्रकल्प गुजरात आणि नागपूरमध्ये पळविण्यात आले आहेत. औरंगाबादला दोनशे कोटींचा निधी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकसाठी अजून दमडीही दिलेली नाही. त्यातच मनसेच्या प्रकल्पांचा समावेश स्मार्ट सिटीत करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडून भाजपच्या विकासकामांचा भंडाफोड केला जाण्याची शक्यता असल्याने या सभेची धास्ती आता भाजपसह शिवसेनेलाही वाटू लागली आहे. राज ठाकरेंच्या गुरुवारच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, या सभेसाठी नवीन व्हिडीओही बनविल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाकरे आता नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेचा कसा पंचनामा करणार याकडे नाशिककराचे लक्ष लागून राहिले आहे