हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. तसेच, जातीपातीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीकाही केली. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) भरभरून कौतुक केले. याबरोबर, “शरद पवारांसोबत राहूनही अजय पवारांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही” असेही म्हणले.
पुण्यात झालेल्या जाहीर सभेत बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. जातीपातीच्या राजकारणावरून बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना केली आणि राज्यात जातीपातीतेचे राजकारण सुरू झाले. राम गणेश गडकरींच्या पुतळ्यावरून राजकारण झाले, भांडारकर आणि जेम्स लेनच्या मुद्द्यावरून राजकारण झाले. परंतु अजित पवारांनी शरद पवार यांच्याबरोबर राहूनही जातीपातीचे राजकारण केले नाही”
त्याचबरोबर, “आज काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात आहेत. परंतु आज मी फतवा काढतो की, सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांनी भरघोस मतांनी विजयी करावे. आज राम मंदिर उभे राहिले असेल, तर ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे. कारसेवकांनी जे काम केले, त्याचे फळ आज बघायला मिळत आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना पुणेकरांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे” असे खुले आवाहन राज ठाकरे यांनी केले.
अजित पवारांची प्रतिक्रीया
दरम्यान, राज ठाकरेंनी केलेल्या याच वक्तव्याचा उल्लेख अजित पवार यांनी बीडच्या सभेमध्ये केला. यावेळी ते म्हणाले की, “कालच राज ठाकरेंनी सभेत जाहीरपणे सांगितले की, अजित पवार जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी कधी जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊनच पुढे जाण्याची माझी भूमिका आहे. शिव-शाहू-फुले आंबेडकरांचे विचार घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो”