गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; वाचाळवीर नेत्यांना फटकारलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती (Mahatma Gandhi Jayanti) आहे. त्यानिमित्त देशभरातून गांधींजीना अभिवाद करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्विट करत गांधी जयंतीच्या शुभेच्या दिल्या आहेत. मात्र महात्मा गांधीजींचे विचार सांगत असताना त्यांनी राज्यातील वाचाळवीर नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे, असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहे.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट –

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल, आज महात्मा गांधींची जयंती. ‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’, असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर….याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं,हे सध्या सुरु आहे. महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा. गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर 75 वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

दरम्यान, राज ठाकरे यांनी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.लालबहाद्दूर शास्त्रींची पंतप्रधानपदाची कारकीर्द अवघ्या दोन वर्षांची. पण या दोन वर्षात त्यांनी देशात धवलक्रांतीची, कृषीक्रांतीची बीज रोवली, पाकिस्तानच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर दिलं, असे राज ठाकरे म्हणाले.