हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, सगळ काही हिसकावण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना धोक्यांची घंटा सांगितली आहे. राज ठाकरे आज अलिबाग दौऱ्यावर असून त्याठिकाणी त्यांनी जमीन परिषद आयोजित केली होती. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांबाबतच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत जनतेला सावध राहण्याचा सल्ला दिलाय.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई या महत्वाच्या शहरांची आधीच वाट लागली आहे. तुमची पायाखालची जमीन निघून चालली आहे. माथेरान,कर्जत आणि नेरळ मधील जमिनी कोण घेत आहेत हे तुम्हाला माहित आहे का ? असा सवाल राज ठाकरेंनी केला. रायगडच्या नेरळमध्ये इमारती उभ्या राहात आहेत. तिथे कोण फ्लॅट घेत आहेत जाऊन बघा. मराठी लोक आहेत का बघा. एवढंच नव्हे तर कर्जत, खालापूर हा पट्टा सुद्धा तुमच्या हातातून जातोय. तुमची जमीन आहे त्यामुळे विकायची की नाही ते तुम्ही ठरवा पण त्याचा मोबदला तरी तुम्हाला व्यवस्थित मिळतोय का?? आणि एकदा जमीन गेल्यावर तुम्ही परत विकत घेऊ शकता का?? असा सवालही राज ठाकरेंनी केला. तुम्हाला कदाचित काही वर्षांनी आठवेल की राज ठाकरे आपल्याला सांगून गेला होता असं म्हणत त्यांनी इशारा दिला.
बाहेरून रायगड, रत्नागिरी या भागामध्ये येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिकांना भागीदारी का दिली जात नाही? असा सवालही राज ठाकरेंनी केला. आज जर बाहेर कोणता व्यवसाय करायचा असला तर तुम्हाला तेथील लोकांना पार्टनर घ्यावे लागतं. मग इथे का नाही? दुसरीकडे नोकऱ्या करू नका, तुमच्या तालुक्यात जे काही उद्योग असतील ते तुमचे पाहिजेत, बाकीच्या लोकांच्या हाताखाली काम करू नका. नाहीतर मग सगळे हातातून गेल्यावर डोक्याला हात लावून पश्चाताप करायची वेळ येईल असं राज ठाकरे यांनी म्हंटल.