…तर गालावर वळ उठतील; मुलुंडमधल्या घटनेवर राज ठाकरे संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या सोशल मीडियावर एका मुंबईमधील महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, ती महिला मुलुंडमध्ये ऑफिससाठी जागा शोधण्यासाठी गेली असता तिला मराठी असल्यामुळे नाकारल्याचे सांगताना दिसत आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषिकांचे स्थान नाकारले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या घटनेवर नागरिकांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. तसेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, मुंबईत मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला आहे.

…तर गालावर वळ उठतील हे निश्चित

त्याचबरोबर, “हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे” अशा शब्दात राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकारावर भाष्य केले आहे.

दरम्यान, मुलुंड भागात संबंधित महिला ऑफिससाठी जागा शोधण्यासाठी गेली होती. मात्र एका सोसायटीत ती महाराष्ट्रीयन असल्यामुळे तिला जागा देण्यात आली नाही. एका गुजराती व्यक्तीनेच या महिलेला महाराष्ट्रातील व्यक्ती असल्यामुळे जागा नाकारली. या सर्व घटनेची माहिती संबंधित महिलेने एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे. त्यानंतर या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.