धक्कादायक ! बाईक अपघातात बालमित्रांचा दुर्दैवी अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील जयपूरमधील अजमेर रोडवर झालेल्या अपघातात भरधाव वाहनाने धडक दिल्याने दोघा दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले तरुण हे एकमेकांचे लहानपानापासूनचे मित्र होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी अपघातानंतर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कोणालाही वाचवता आले नाही. यानंतर या दोघां मित्रांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. यामधील एका तरुणाचे दोन महिन्यांनी लग्न होणार होते. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. बापलेकांच्या मृत्यूनंतर या तरुणाच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?
कपिल खटाणा आणि मोहित शर्मा अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही जयपूरमधील पुरानी बस्ती या ठिकाणचे रहिवाशी आहेत. घटनेच्या दिवशी मोहित कपिलसोबत स्कूटीवरुन घरातून निघाला होता. कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत, असे सांगून हे दोघे घरातून निघाले होते. त्यानंतर अजमेर रोडवरील पुलावर अज्ञात वाहनाने या दोघांच्या स्कूटीला धडक दिली आणि कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.

एकामागून एक दोघांचाही मृत्यू
या अपघातात दोघांच्याही डोक्याला मार लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघेही बराच वेळ रस्त्यावर पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. या परिसरात गस्त घालणारे पोलीस अधिकारी पृथ्वीपाल सिंग घटनास्थळावर गर्दी पाहून पोहोचले. तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक दोन्ही तरुणांना मदत करत होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही रुग्णवाहिकेतून सवाई मानसिंग रुग्णालयात पाठवले. मात्र त्यागोदरच दोघांचा मृत्यू झाला होता.

कपिलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या अपघातातील कपिलचे 24 एप्रिलला लग्न होणार होते. मात्र त्या अगोदरच काळाने त्याच्यवर घाला घातला. कपिलच्या घरातून लग्नाची वरात निघण्याऐवजी त्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. तसेच मोहितच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मोहितच्या खांद्यावर येऊन ठेपली होती. कपिल आणि मोहित या जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment