कराड | प्राथमिक शिक्षकांच्या ताब्यात मुलं असतात. त्यांना घडवण्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. राजेंद्र जगताप यांनी त्या जबाबदारीचे भान राखून शिक्षण सेवा केली. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे, असे मत राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
कोडोली (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेंद्र जगताप यांचा पत्नी वंदना जगताप यांच्या समवेत सपत्नीक सेवानिवृत्ती अभिष्टचिंतन सोहळा वडगाव हवेली येथे पार पडला. यावेळी ना. पाटील बोलत होते. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदिश जगताप, संचालक दयानंद पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रियांका ठावरे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय थोरात, कोडोलीच्या सरपंच मिनाक्षी जगताप, गटशिक्षणाअधिकारी शबनम मुजावर, रमेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. सुरेश भोसले, संभाजीराव थोरात, सौरभ कुंभार, सौ. मुजावर यांची भाषणे झाले. विनायक निकम यांनी प्रास्तविक केले. जगदिश जगताप व रमेश जगताप यांनी स्वागत केले. श्री. ढापरे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. आनंदराव जानुगडे व माधवी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. जगदिश जगताप यांनी आभार मानले.