कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तसेच सरपंच परिषदेचे कराड तालुकाध्यक्ष सुर्यकांत उर्फ राजेंद्र आप्पासो पाटील (वय 52) याचे कोरोनाने आजाराने निधन झाले. कोयना वसाहत गावचे दोनवेळा सरपंच पद भूषिवले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाशी त्यांचा लढा चालू होता.
सन 2005 ते 2010 व 2015 पासून आजअखेर त्यांनी सरपंच पदावर होते. या काळात लोकसहभागातील अनेक योजना गावात राबविल्या. निर्मल ग्रामसह अनेक शासकीय योजनेत गावचा ठसा उमटविण्यात त्यांचा वाटा होता. मनमिळावू स्वभाव असल्याने ते तालुक्यामध्ये सर्वांच्या परिचयाचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कोयनावसाहत,मलकापुर, तसेच तालुक्यातील त्यांच्या हितचिंतकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.ते कृष्णा उद्योग समूहाचे डाॅ.सुरेशबाबा भोसले, डाॅ.अतुलबाबा भोसले , विनायक भोसले, यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोयनावसाहतीची एकहाती सत्ता मिळवली होती. स्वच्छ कारभार, उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
आई वडील नोकरी निमित्त कराडला कुटूंबासह स्थलांतर झाल्यामुळे ते सुरुवातीच्या काळात कराड येथील सोमवार पेठेत राहण्यास होते. नंतर ते कोयनावसाहत येथे स्थायिक झाले. राजू पाटील यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते कोयनावसाहत परिसरामध्ये लोकप्रिय असे व्यक्तिमत्व झाले. त्याच्या मागे पत्नी, मुलगा व आई- वडिल असा परिवार आहे.