हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लवकरच कोल्हापूरचा दौरा केला जाणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोठे विधान केले आहे. 36 वर्षापासून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत काम केले होते. माझे ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील पण राजकीय गुरु मात्र, एकनाथ शिंदेच आहेत, असे क्षीरसागर यांनी म्हंटले.
माजी आमदार क्षीरसागर यांनी आज माध्यमाशी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांचा कोल्हापुरातही 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान दौरा होणार आहे. जनतेने त्यांना स्विकारले तर आहेच पण कडवट शिवसैनिकही त्यांच्याबरोबरच आहे. त्यामुळे कोल्हापुरात त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. केवळ स्वागतच नाहीतर रखडलेली कामे मार्गी लावण्याबाबतही बैठक होणार आहे.
कोल्हापुरकर हे हुशार… : क्षीरसागर
लेखापुरात आघाडी सरकारच्या कामांना शिंदे सरकारकडून स्थगिती दिल्याचा आरोप होत असल्याने त्यालाही यावेळी माजी आमदार क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आघाडीच्या काळात ज्या कामांना मंजुरी दिली आहे ती बरोबर आहे की नाही याबाबत तपासणी होण्यासाठी स्थगिती दिली आहे. मात्र, विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण कोल्हापुरकर हे हुशार आहेत.