हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. “एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं,” असे शेट्टी म्हणाले.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकण्यास मन तयार होत नाही.
एन. डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं. ते आंदोलनात उतरल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना दखल घ्यावी लागायची, असं राजू शेट्टी म्हणाले. टोल नाका प्रश्न, शेतकऱ्याचं आंदोलन, सीमा भागाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी लढा दिला, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.
कोल्हापुरात उद्या होणार अंत्यसंस्कार
प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर उद्या, मंगळवारी कोल्हापुरातच पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थीव अत्यंदर्शनासाठी कदमवाडी परिसरातील शाहू कॉलेज येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमी येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.