कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. लॉकडाऊनच्या काळातील एप्रिल, मे, जून महिन्याचे बील माफ करावे म्हणून आम्ही सातत्याने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे झाले, वीज बिल जाळून झाली, महावितरण कार्यालयाला कुलुपे लावली. सरकारने सुरवातीला सकारत्मक प्रतिसाद दिला. ऊर्जामंत्र्यांनी गोड बातमी देतो म्हणून सांगितले. सरकारने जाहीर केले होते, आम्ही आता वीज बिल माफी केली जाईल. विरोधी पक्षांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर वीजतोडणीच्या आदेशाला पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली. मात्र निर्णय होण्याआधीच आठ दिवसांत स्थगिती उठवून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. कराड येथे स्वर्गीय यशवंराव चव्हाण यांच्या स्मृतिदिननिमिुत्त अभिवादन करण्यासाठी आले असता,ते पत्रकारांशी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, राज्य सरकारने अनेकांना सवलती देवून झाल्या, मंत्र्यांचे दालन अलिशान करायला पैसे कुठून आले. गेल्या वर्षभरातील बजेट कोरोनाच्या नावाखाली विकास कामांना कात्री लावून खर्च केले. तो खर्च करत असताना मास्क,व्हेटिंलेटर किती रूपयाला खरेदी केले ते आम्हांला माहीती आहे. औषधात किती भ्रष्टाचार झाला हे माहीती आहे. परंतु राज्यातील १ कोटी २५ लाख घरगुती वीज ग्राहकांना फक्त १०० युनिटप्रमाणे वीज बिल माफ करायचं झाल. तर केवळ ३ हजार कोटी रूपये लागणार होते, ते सरकारकडे नसतील, तर त्यापेक्षा काहीही दुर्देव नाही.
एका बाजूला महाराष्ट्र सरकार ज्याच्याकडून वीज खरेदी करते, त्याचे दर कमी होत आहेत. दुसऱ्या बाजूला महावितरण कंपनी ज्याना वीज देते त्यांचे दर वाढतायत हे गौडबंगाल आम्हांला कळायला पाहिजे. अशा पध्दतीने दादागिरी, गुंडागिरी करून सर्वसामान्यांची वीज ग्राहकांची वीज तोडण्याचा प्रयत्न झाला. तर वीज तोडणी करणाऱ्यांना गावातून पिटाळून लावा.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा