कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड उत्तर मतदार संघातील कराड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकास कामांसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. कराड उत्तरच्या इतिहासात पहिल्यांदाच 54.2 कोटींचा निधी विकास कामासाठी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्रचे सचिव रामकृष्ण वेताळ यांनी दिली.
रामकृष्ण वेताळ यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत विकास कामांसाठी मंजूर झालेल्या निधीबाबत माहिती दिली. यावेळी माजी जि. प. सदस्य सागर शिवदास, माजी पं. स. सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील व प्रमोद गायकवाड, तालुकाध्यक्ष महेश जाधव, माजी तालुकाध्यक्ष सुर्यकांत पडवळ, शंकरराव शेजवळ यांची उपस्थिती होती.
यावेळी वेताळ म्हणाले की, कराड उत्तर मतदार संघाचा विकास मागील अडीच वर्षात रखडला होता. या भागातील अनेक कामे आम्ही सातारा जिल्हा भाजपाच्या वतीने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवली होती. यासाठी भाजपाचे सातारा जिल्हा अध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला.
या निधीतून पार्ले बाह्य वळण रस्ता 7 कोटी, कृष्णा कॅनॉल ते बनवडी रस्ता 5 कोटी, मसूर पोलिस चौकी ते रिसवड रस्ता चौपदरीकरण 3.5 कोटी, शिवडे फाटा ते कोरेगाव फाटा रस्ता 5 कोटी, विरवडे फाटा ते ओगलेवाडी रस्ता 2 कोटी मसूर ते शहापूर फाट्यापर्यंत रस्ता 5 कोटी, कोरेगाव फाटा ते मसूर पोलीस चौकी या बंदिस्त गटारासह रस्त्यासाठी 3.5 कोटी, इंदोली-कोरिवळे- जंगलवाडी रस्त्यावर पूल बांधकामासाठी 16 कोटी, अंधारवाडी-चोरे-मरळी-पाल अशा सुमारे 13 किलोमीटर पासून 22 किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या कामासाठी 7.2 कोटी निधी मजूर झाला असून अशी अनेक विकास कामे होणार आहेत. रस्त्यांची समस्या दूर होऊन रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण होणार आहे.
भविष्यात कराड उत्तर मधील रहदारीच्या सर्व समस्या सुटणार आहेत. मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सचिव विक्रम पावसकर वर्धन ऍग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम, माण-खटाव ऍग्रोचे चेअरमन मनोज घोरपडे यांचे मतदारसंघाच्या वतीने अभिनंदन होत आहे. भविष्यातही आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस निधी मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत.