Ramdas Athawale : निवडणूक न लढता कॅबिनेट मंत्री होण्याची निंजा टेक्निक रामदास आठवलेंनाच जमलीय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला आपल्या 36 उमेदवारांचं डिपॉझिटही वाचवता आलं नाही… तर स्वतः प्रकाश आंबेडकर यांना आपल्या हक्काची अकोल्याची सीटही वाचवता आली नाही… कट टू…लोकसभेची एक ही जागा न लढवता रामदास आठवले यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या जीवावर सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची काल शपथ घेतली… तसं बघायला गेलं तर आंबेडकरी चळवळीतून वर आलेली… दलितांचं, वंचितांचं राजकारण जीवंत ठेवणारी महाराष्ट्रातील हे दोन राजकीय चेहरे… दोघांच्याही राजकारणाची सुरुवात एकत्रच झाली…पण बाबासाहेबांचे नातू असतानाही प्रकाश आंबेडकरांना जे जमलं नाही ते रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) करून दाखवलय… एकीकडे वंचितचा आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना खासदारकी जिंकता येत नाहीये. तर दुसरीकडे रामदास आठवले हे कोणत्याही निवडणुकीला सामोरे न जाता सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतायत…

विनोदी शैली, उत्स्फूर्त कविता आणि गुलाल तिकडं चांगभलं असा अप्रोच घेऊन राजकारणात आलेल्या रामदास आठवलेंना बेरजेचं जे गणित जमत ते उच्चशिक्षित, अभ्यासू आणि बाबासाहेबांचा वारसा लाभलेल्या प्रकाश आंबेडकरांना का जमत नाही?… वंचितच्या राजकारणापेक्षा रिपब्लिकन पक्षाचं राजकारण कसं वेगळंय? महाराष्ट्राच्या दलित चळवळीचं येणाऱ्या काळात कुठला पक्ष नेतृत्व करेल? तेच पाहूयात…. आंबेडकरांच्या वंचितला जे जमलं नाही ते आठवले यांनी सहजपणे करून दाखवलं त्याला पाहिलं कारण ठरलं ते आंबेडकर आणि आठवलेंचा पॉलिटिकल अप्रोच

निवडणूक न लढता, मंत्री होण्याची निंजा टेक्निक, Athawale यांनाच जमलीय | Modi Cabinet Ministers 2024

इतिहास पाहिला तर 1994 पूर्वी आंबेडकर रिपब्लिकन पक्षातच काम करत होते… मात्र 1994 मध्ये त्यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाची स्थापना करून स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली… मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा अकोला पॅटर्न वगळता प्रकाश आंबेडकर राजकारणाच्या पटलावर सतत चाचपडतानाच पाहायला मिळाले…1990 मध्ये त्यांची राज्यसभेतून संसदेत एन्ट्री झाली… यानंतर त्यांनी अनेक लोकसभा निवडणूक लढवल्या पण सगळीकडे पराभव स्वीकारावा लागला… 1999 आणि त्यानंतरची एक टर्म काँग्रेसच्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकर लोकसभेतून दिल्लीत गेले… पण यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसपासून फारकत घेत आपल्या स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली…पुढे तर त्यांनी भारिप बहुजन महासंघ बाजूला सारत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा आगळावेगळा प्रयोग केला…महाराष्ट्राला तिसरी आघाडी देण्याचा अप्रोच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लोकसभा लढवली… वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी 2019 च्या या निवडणुकीत आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घातली… काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला या वंचित फॅक्टरमुळे तब्बल 10 हून अधिक जागांवर पाणी सोडावं लागलं…वंचितच्या जीवावर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील खासदार झाले ही गोष्ट वेगळीच… आंबेडकरांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली असली तरी यानंतर पुन्हा एकदा सतत भूमिका बदलण्याचा प्रकार त्यांनी सुरूच ठेवला…

आंबेडकरांनी ठाकरेंसोबत युती केली… पण आपण महाविकास आघाडी सोबत नाही आहोत, असा स्टॅन्ड घेतला…राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर या काळात त्यांनी टीका केली…पण पुढे लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू झाली तेव्हा त्याच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत त्यांनी मांडीला मांडी लावायची तयारी दाखवली…पण तिकीट वाटपाच्या चर्चेत फिस्कटल्याने आंबेडकरांनी पुन्हा स्वतंत्र राजकारण सुरू केलं…यात कुठे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दे… तर कुठे अपक्ष, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दे… असा सावळा गोंधळ वंचितच्या गोटात सुरू होता…थोडक्यात प्रकाश आंबेडकरांची राजकीय अस्थिरता आणि आघाड्यांचं राजकारण जमण्याइतपत ते मुरलेले राजकारणी नसणं… या सगळ्या गोष्टी त्यांना बॅक फुटला घेऊन जातात… त्याचाच फटका 2024 च्या लोकसभा निकालला बसला असून आंबेडकरांचं राजकारण उतराला लागलं आहे…

दुसरीकडे रामदास आठवले हे दलित पॅंथरचे कट्टर कार्यकर्ते…दलित चळवळीच्या मुशीत आपली सामाजिक आणि राजकीय समज वाढवत आठवलेंनी आपल्या स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली…रिपब्लिकन पक्षात काम करताना रामदास आठवले यांचा कल सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे होता. 1990 ते 1996 या काळात त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम केल. या काळात आठवलेंनी समाजकल्याण, परिवहन, रोजगार हमी या खात्यांची मंत्रिपदं सांभाळली… नंतरच्या काळात रामदास आठवले मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. 1998 मध्ये रामदास आठवले पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले. त्यानंतर सलग दुसऱ्या टर्ममध्येही लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. खासदारकीच्या तिसऱ्या टर्ममध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी घरोबा केला…काँग्रेसशी बिनसल्यानंतर त्यांनी भाजपला जवळ केलं… त्यानंतर सलग दहा टर्म भाजप सत्तेत असताना आठवलेंना आरामशीर मंत्रीपद मिळत गेली… त्याचा वापर त्यांनी आपल्या पक्ष वाढीसाठी करून घेतला…

आंबेडकरांपेक्षा आठवलेंचं राजकारण प्लसमध्ये राहिलं त्यांचं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे हवा कुणाच्या दिशेने आहे याचा आठवलेंना येणारा अचूक अंदाज.

महाराष्ट्रात अशी काही मंडळी आहेत की ते दुसऱ्या पक्षासोबत गेले की समजा त्यांची सत्ता गेली… पण आठवले मात्र याला अपवाद आहेत.. आठवले जिथं गुलाल तिथंच… असा एकूण त्यांच्याबाबतीत प्रकार घडतो… 2009 पूर्वी ते काँग्रेस सोबत होते तेव्हा यूपीए आघाडीची सत्ता होती… जेव्हा ते भाजपबरोबर गेले तेव्हापासून सलग दोन टर्म भाजप सत्तेत आणि आठवले मंत्रीपदात राहिले… मुळात पावर पॉलिटिक्समध्ये टिकून राहणं यावरच त्यांचं राजकारण टिकून असल्यानं आठवलेंना इतर कोणत्या गोष्टींपेक्षा सत्ता महत्वाची वाटतं आली… आणि त्यात त्यांना यशही मिळत गेलं.. दुसरीकडे आंबेडकर यांचा भर हा सत्तेत राहण्यापेक्षा स्वतःच राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याकडे जास्त होता… त्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं असं म्हणताही येईल… पण राजकारण कुठल्या दिशेला सरकेल? याचा अचूक अंदाज आठवलेंप्रमाणे आंबेडकरांना लावता आला नाही… त्यामुळे 2019 मध्ये स्वतंत्र राजकारण करून भाजपची बी टीम असल्याचा टॅग स्वतःहून ओढवून घेतला…तर 2024 मध्ये ही इमेज पुसण्याच्या नादात पक्षाचा प्रभावच नाहीसा करून टाकला…लोकसभेच्या निकालात अगदीच किरकोळ कामगिरी केल्यामुळे प्रकाश आंबेडकर विधानसभेलाही राजकारणावर किती प्रभाव टाकतील? हे आत्ताच सांगता येत नाही…पण लोकसभेचा असणारा मोठा चान्स आंबेडकरांनी घालवला… असं म्हणायला हरकत नाही…

आंबेडकरांपेक्षा आठवलेंचं राजकारण प्लसमध्ये राहिलं याचं शेवटचं कारण सांगता येईल ते म्हणजे लोकसभा निवडणुकांचे बदललेले डायमेन्शन्स…

महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राष्ट्रवादी आणि शिवसेनासारखे पक्ष फुटल्यामुळे या दोन्ही गटांकडे सहानुभूतीचं वार होतं… महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी घासून फाईट होणार असल्यामुळे स्वतंत्र राजकारणाचा विचार म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार झाला असता… महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना 2 ते 3 जागा मिळत होत्या पण जास्त जागांवर अडून बसल्यामुळे त्यांचं आघाडीत फिस्कटलं… यानंतर वंचितनं स्वतंत्र निवडणूक लढवली… आपल्यावर भाजपच्या बी टीमचा शिक्का लागू नये, यासाठी त्यांनी महत्त्वाच्या ठिकाणांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करत 38 जागा लढवल्या… पण यातल्या तब्बल 36 जागांवर वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं… वंचितचा व्होट शेअर घसरला… मतदानाचा टक्काही खाली आला… थोडक्यात महाराष्ट्राच्या जनतेने वंचितवर अविश्वास दाखवलाय, असा त्याचा अर्थ निघू शकतो… त्यामुळे आघाडी सोबत निवडणूक लढवून आज कदाचित आंबेडकरांना आपली सीट वाचवता आली असती.. पण त्यांनी एकला चलो रे म्हणत पुन्हा एकदा वंचितचं राजकीय पानिपत करून टाकलय… दुसऱ्या बाजूला स्वतंत्र राजकारण करण्यापेक्षा महायुतीमध्ये राहून आठवले सेफ राहिले… निवडणूक नाही, प्रचार नाही की रुसवा फुगवा नाही… आपल्या समाजाची निर्णायक व्होट बँक सोबत घेऊन आठवलेंनी टॅक्टिक वापरल्याने त्यांना पुन्हा एकदा आरमत राज्यमंत्री मिळालंय…

अर्थात हे आम्ही सगळं सांगितलं असलं तरी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांची कार्यपद्धती, राजकारण आणि उद्देश वेगवेगळे असल्याने त्यांच्यात तुलना करता येणार नाहीच… पण शेवटी राजकारणामध्ये तुम्ही पॉवर पॉलिटिक्समध्ये कुठे आहात? यावरूनच तुमच्या पक्षाचं आणि तुमचं भविष्य ठरत असतं… इथे मात्र आंबेडकर कच्चे राहतात एवढं मात्र निश्चित… बाकी प्रकाश आंबेडकर हे राजकारणात नेमके कुठे चुकले? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,