नवी दिल्ली | कोरोना विषाणुने जगभर थैमान घातले आहे. जगात कोरोनाबाधितांची संख्या ७७ लाखांवर पोहो्ली आहे. तर देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनावर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अशात आता योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा केला आहे.
‘पतंजलीच्या औषधाने शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. या औषधाचा क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा रिझल्ट देखील येणार आहे. मात्र, आतापर्यंत औषध घेतलेल्या 80 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे’. या औषधाच्या सेवनाने कोरोनावर मात करणे शक्य होणार असा दावाही रामदेव बाबा यांनी केला आहे.
दरम्यान, आतापर्यंत पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांच्या औषधाने बरे झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा डेटा तयार केला आहे. त्याचपद्धतीने कोरोनामधील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि सर्व वयोगटातील लोकांचा डेटा आहे. यासह, शेकडो लोकांवर क्लिनिकल चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत.