रमेशकुमार..! कधी काळचा खुंखार नक्षलवादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

व्यक्तिवेध | दत्ता कानवटे

रमेशकुमार..! कधिकाळाचा खुंखार नक्षलवादी… पण हल्ली शेती करतोय… नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील उमरी बाजार गावाच्या डोंगरात असलेल्या निबिड जमिनीवर याने शेती उकरली आणि आता त्यावरच गुजराण करतोय, मी त्याच्याकडे गेलो ते भर हिवाळ्यात थंडी अंगाची हाडं कडकडून सोडत होती त्यावेळी..! उन्हे आणखी निटसी उतरली नव्हती अगदी इतक्या भल्या सकाळी मी त्याच्या शेतावर पोचलो, थंडीने अंग गारठून गेलेलं त्याने अवस्था बघून तीन लाकडावर लगेच चहाचे भागोनो ठेवले…

इतक्या निरागस पणे हे तो सगळं करत होता की कधी काळी हा नक्षलवादी असावा याचाच मला विसर पडला, पण त्याची काटक अंगकाठी, धिप्पाड शरीयष्टी आणि साठीत पोचला तरी नव्या पोरासारखी चपळाई पाहून सहज वाटलं नक्षलवादी आणखी कसा असावा..! रामेशकुमारने शेतात छान आकडा बनवलाय, दोन चार बाजा बसायला बाकडे सगळं शेतीचं समान चापून चोपून ठेवलेलं, अगदी ऐटबाज..! सगळ्या शेतीच्या एकूण मंडणीवरून हा पक्का शेतकरी वाटत होता पण माझ्या मनात दोन प्रश्न उमटले हा नक्षलवादी बनला कसा आणि पुन्हा ते सगळं सोडून एक निरागस नागरिक बनला कसा..! या त्याच्या दोन्ही बाजूच्या प्रवासाची कहाणी खूप थरारक आणि रंजक आहे.

1980 च्या दशकात मराठवाड्यातल्या खासकरून किनवट परिसरातल्या आदिवासींवरही घृणास्पद अत्याचार व्हायचे, त्यातल्या त्यात आदिवासी मुलींच्या बाबतीत तर अत्याचाराची परिसीमा व्हायची, रामेशकुमारच्या गावातही एका सावकाराने दोन मुलींवर असेच अत्याचार केले, पण त्यात त्याला न्याय देणारा कुणीच पठ्या गावात तरी नव्हता पण त्याच वेळी विजयकुमार नावाच्या एका नक्षलवाद्याचं वादळ किनवट तालुक्यात घोंगावत होतं, एक रात्री हाच विजयकुमार गावात दाखल झाला आणि त्याने अत्याचार करणाऱ्या सावकाराच्या देहाचे तीन तुकडे करून उमरी बाजारच्या रस्त्यावर फेकले बस त्या विजयकुमारवर हा रामेशकुमार फिदा झाला आणि बनला नक्षलवादी..!

पुढे कित्येक वर्ष रामेशकुमार हा विजयकुमार बरोबर जंगलात फिरत राहिला, अनेकांचे खून पाडत राहिला, राहणं जंगलात खाणं जंगलात, झोपणं जंगलात फक्त न्याय करायच्या वेळी गावात अशी परिस्थिती होती. अंथरायला ब्लॅंकेट पांघरायलाही तीच, पावसाळ्यात फक्त एक हलकी पालिथिन वरून घ्यायची बस झाला आसरा… असे त्याने एक दोन नव्हे कित्येक वर्ष काढले आणि आदिवासींच्या हक्कासाठी लढत राहिला…

पण 1993 साली मात्र हे सगळं संपलं, किनवटच्या जुनापानी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली यात जहाल नक्षलवादी विजयकुमार मारला गेला, रामेशकुमार आणि इतर साथीदार झुंज अर्ध्यावर सोडून पळून जाण्यात यशस्वी ठरले… पण चळवळीचा म्हरोक्याच धारातीर्थी पडल्यामुळे चळवळ चालवायची कशी असा प्रश्न होता शेवटी रामेशकुमार सरेंडर झाला, तब्बल सात वर्षांची सजा भोगून तो निर्दोष सुटला कारण कुठलेच पुरावे त्याच्याविरोधात सरकार देऊ शकली नाही… कोर्टाततून सुटल्यानंतर रामेशकुमारने छानशी शेती सुरू केलीय…

शेतीत त्याचं बरं चाललंय, कोरडवाहू शेती पोटापूरतं देते, नाही पुरलं तरी तो भागवतो, पण त्याची सध्या सर्वात सुखावणारी बाब ही की तो लोकशाही मार्गाने स्वतःच्या मागण्या आणि हक्कासाठी लढाई सुद्धा लढतो, त्याने तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यशस्वी उपोषणे सुद्धा केलीत, श्रीकर परदेशी, सुरेश खोपडे यांच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्यांशी त्याचा वन टू वन संपर्क सुद्धा आहे. त्याच्या अनेक आंदोलनाला यश सुद्धा आलं आहे. त्यामुळे कधीकाळी बंदूकीच्या जोरावर न्याय मिळवणारा हा नक्षलवादी आता हातात रूमनं घेऊन अनेक प्रश्न सोडवू शकतो हे विशेष…

Datta Kanawate

दत्ता कानवटे, औरंगाबाद.
9975306001

Leave a Comment