साताऱ्यात राजांचे मनोमिलन नावापुरते, नाईक निंबाळकर यांची राष्ट्रवादीच्या बैठकीकडे पाठ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलानी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुरते मनोमिलन झाल्याचा दावा केला जात असला तरी चित्र मात्र वेगळे असल्याचं दिसत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार आणि राष्ट्रवादी च्या पदाधिकारी यांची बैठक आज राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघे उपस्थित होते पण या दोघांनी एकमेकांकडे पाहिले सुद्धा नाही. एकूणच या बैठकीला राष्ट्रवादीचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार उदयनराजे यांच्या प्रचारासाठी २४ मार्चला कराडमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रचार सभा घेतली जाणार आहे. या सभेला राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद बाजूला ठेवून ही सभा मोठी करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. मात्र अद्यापदेखील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था असल्याचे या बैठकीत पाहायला मिळाले. शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या भाषणात २४ तारखेला होणारी राष्ट्रवादीची प्रचार सभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. तर शिवेंद्रराजे यांच्यात काही गैरसमज असल्याचे आणि ते दूर झाल्याचा दावा उदयनराजेंनी केला.

दरम्यान, सातारा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची राष्ट्रवादी कार्यालयात बैठक झाली. खासदार उदयनराजे भोसलेंसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी आमदारांच्या उपस्थितीत होते. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर जिल्ह्यातील आमदारांसोबत ही पहिलीच बैठक होती. दरम्यान, या बैठकीकडे रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाठ दाखवली. रामराजे नाईक निंबाळकर २४ तारखेच्या प्रचार सभेलाही पाठ फिरवणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.