स्त्रियांच्या सामाजिक दुय्यमपणाला सणसणीत चपराक देणारा, राणी मुखर्जीचा मर्दानी २

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बॉलिवूड कट्टा । माझा भारत महान या वाक्याचा प्रत्यय यावा अशा गोष्टी मागील काही कालावधीत भारतात घडताना दिसून येत नाहीत. किंबहुना त्या दिसून आल्या तरी त्यांचं प्रमाण कमी झालय एवढं मात्र नक्की.. देशातील लोकांची वाढती असुरक्षितता हा या प्रकरणातील प्रमुख अडथळा आहे असंही मानायला काहीच हरकत नाही. विशिष्ट जाती-धर्मातील लोकांना टार्गेट करणे, त्यांचा छळ करणे, महिलांवरील वाढते अत्याचार या सर्वच गोष्टी दुर्लक्षित करता येण्यासारख्या बिलकुल नाहीत. हैद्राबाद बलात्कार आणि खून प्रकरण, त्यासोबतच उन्नाव बलात्कार पीडितेला जाळून मारलं जाण्याच्या पार्श्वभूमीवर या सर्वांवर वास्तव भाष्य करणारा दमदार चित्रपट म्हणून मर्दानी २ नक्कीच पहावा लागेल.

एखादी मुलगी शिकली, मोठी झाली की तिने काय करावं हे सामाजिक वातावरणानं ठरवायचं असा एकूण प्रचलित प्रकार भारतासारख्या देशात पहायला मिळतो. तिने घरातील परंपरा, समाजातील राहणीमानाची पद्धत यांच्या बाबतीत वेगळं वागून चालणारच नाही असं एकूण वातावरण पहायला मिळतं. मुली आणि महिलांवर अत्याचार झालेच तर त्यात मुलीचा दोष नसेल कशावरून ? हा निर्लज्ज प्रश्नही उपस्थित केला जातोच. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मर्दानीमधून मिळतात. स्त्रियांचं कर्तृत्व अधोरेखित करण्यासोबतच ती करत असलेल्या कामाला पुरुषांना दुय्यम दाखवण्याचं काम समजू नका आणि तिला ‘काहीतरी दिलंय’ या सामाजिक दबावात ठेवू नका हा सोपा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे.

एका सक्षम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका (एस.पी शिवानी रॉय) राणी मुखर्जीने चित्रपटात साकारली आहे. एका राजकीय हेतूसाठी आयात केलेल्या गुंडांकडून त्याच्या वेडपट स्वभावाला अनुसरून महिलांना त्रास देण्याचं काम सुरु असतं. सिरीयल किलर प्रकारात मोडणारा हा गुंड (सनी) जिल्ह्याच्या महिला पोलीसप्रमुखाला (एस.पी शिवानी रॉय) आव्हान देण्याच्या प्रयत्नात अनेक करामती करत असतो. महिलांनी जास्त शहाणपणा न दाखवता आपल्या मर्यादेत राहायचं आणि पुरुषांना शहाणपणा शिकवायचा नाही या विचाराने ईर्षेला पेटलेला व्हिलन विशाल जेठवा (सनी) याने साकारला आहे. चित्रपट कमालीचा सस्पेन्स दाखवणारा असून खुनी आणि पोलिसांची जुगलबंदी रंजकरित्या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारतात महिलांच्या बाबतीत होत असलेल्या वाढत्या अत्याचारांच्या घटना आणि आरोपींचा निर्ढावलेपणा चित्रपटातून समर्पकरीत्या दाखवला आहे. भारतीय प्रेक्षकांच्या मनात अत्याचाराविरुद्ध चीड आणण्यासाठी असे चित्रपट उपयोगी पडत असले तरी यातील वास्तवाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी राणी मुखर्जीने चित्रपटात टीव्हीसाठी दिलेली मुलाखत आवर्जून पाहावीच लागेल. आरक्षण किंवा अधिकार यांच्या तराजूत महिलांना तोलण्याआधी त्यांना खरोखर आपण माणूस म्हणून पाहणार आहोत का याची खात्री आपल्या मनाला पटवण्यासाठी तुम्ही मर्दानी २ पाहायलाच हवा.