‘रेप इन इंडिया’वर राहुल गांधी ठाम; मोदींच्या ‘दिल्ली रेप कॅपिटल’ विधानाचा दाखला

टीम, HELLO महाराष्ट्र|देशातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात उन्नाव आणि हैद्राबाद मध्ये घडलेल्या अमानुष घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्द्याला धरून आज संसदेत मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर भाष्य करताना रेप इन इंडिया असे विधान केले आहे.

या विधानानंतर संसदेत एकच गदारोळ निर्माण झाला. भाजप खासदारांनी राहुल गांधी विरोधात आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तर राहुल गांधींनी मात्र आपण विधानावर ठाम असून, माफी मागणार नसल्यचे स्पष्ट केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा दाखला देत भाजप खासदारांवर पलटवार केला आहे.

संसदेतील या प्रकारानंतर बाहेर आल्यावर राहुल गांधींनी पात्रकारांशी संवाद साधला, यावेळी राहुल गांधींनी रेप इन इंडियावरुन माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. ‘काँग्रेसची सत्ता असताना निर्भया प्रकरणानंतर दिल्ली रेप कॅपिटल झाल्याचं विधान पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याची व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे. ती व्हिडीओ क्लिप मी ट्विटरवर शेअर करेन’, असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर लगेचच त्यांनी मोदींच्या त्या विधानाची क्लिप ट्विटदेखील केली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर ईशान्य भारत पेटला आहे. त्यावरुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपानं रेप इन इंडियाच्या विधानावरुन वाद निर्माण केल्याचा दावा त्यांनी केला आहे.