वाई | खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित असलेल्या तेरा जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाई पोलिसांनी पुणे-महाबळेश्वर रस्त्यावर भीमनगर वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते. येथील जमिनींचे खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक प्रवीण दिनकरराव शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, प्रवीण शिंदे यांचे साडू लक्ष्मण मारुती पार्टे (तायघाट ता. महाबळेश्वर) यांचे नचिकेता हायस्कूल एकास चालविण्यास दिले होते. त्यावेळी या हायस्कूल चालकामुळे पुण्यातील एका व्यक्तीची ओळख झाली होती. यावेळी संबंधिताने गज्या मारणे टोळीसाठी काम करत असल्याचे सांगितले होते. यानंतर या संबंधिताने प्रवीण शिंदे यांना फोन करून वेळोवेळी तुम्ही पाचगणी महाबळेश्वर परिसरात जमिनीचे मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आहेत. याबद्दल तुम्हाला गज्या मारणे टोळीसाठी महिन्याला पंचवीस लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. संबंधित व्यक्तीने टोळी सदस्यांना बरोबर घेऊन वाई येथे घरी येऊन पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. यामुळे प्रवीण शिंदे यांनी पोलिसांशी संपर्क साधून या टोळीच्या सदस्यांबाबत पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना माहिती दिली.
यावेळी पोलिसांनी गज्या मारणे टोळीशी संबंधित वाघू तुकाराम हळंदे ( जकात नाका, वारजे, पुणे), गोरक्षनाथ माणिक शिळीमकर, अमोल बंडू शिळीमकर, विशाल चंद्रकांत शेळके, सौरभ तानाजी शिळीमकर, सचिन अंकुश शिळीमकर (रा. तांभाड, ता. भोर), रोहन रमाकांत वाघ (विंग, ता. खंडाळा), मंदार सुरेश बांदल, राहुल रामकृष्ण कळवणकर, तुषार बाळासाहेब बदे, आनंद तुळशीदास यादव, विक्रम विलास समुद्रे, बालाजी कमलाकर कदम (सर्व, रा. दत्तवाडी, सिंहगड रोड, पुणे) यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांकडून दप्तर अहवाल मागविला होता. त्यांच्याकडून १९ लाख रुपये किमतीच्या तीन गाड्या जप्त केल्या आहेत. त्यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर तपास करत आहेत