हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना आणि भाजप सरकार सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर आल्यानंतर शिंदे गटातील नेते आणि भाजप नेते एकमेकांच्या हातात हात घेऊन राज्याचा कारभार हाकत आहेत. परंतु औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा भाजप नेत्यांकडूनच सरकारविरोधात मोर्चा काढण्याचे ठरले असून भाजप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या संजनाताई जाधव शिंदे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोडमध्ये मोर्चा काढला होता. आता भाजप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कन्नड-सोयगाव तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, संजय गांधी स्वावलंबन आणि श्रावणबाळ योजनेतील प्रश्नासंदर्भात संजनाताई जाधव या भव्य मोर्चा काढणार आहे. त्यांच्या मोर्चात मोठ्या प्रमाणात समर्थक सामील होणार आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या
तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे खात्यावर जमा करावे, शेतकऱ्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, उर्वरित गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा, पी.एम. सन्मान निधीचा लाभ मिळावा, 2021-22 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 15 कोल्हापुरी बंधारे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात येणार आहे.