लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने नऊ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा आरोपीने चिमुकलीला खेळण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून आपल्या घरी घेऊन गेला. यानंतर त्याने या चिमुकलीवर बलात्कार केला. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये घडली आहे.
या घटनेनंतर 9 महिन्यांच्या या चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. ही संतापजनक घटना बुलंदशहरमधील खुर्जा या ठिकाणी घडली आहे. आरोपी तरुण हा पीडितेचा शेजारीच होता. या नराधमाने चिमुकलीला आपल्या घऱी घेऊन जात हे संतापजनक कृत्य केले आहे. कुटुंबीयांनी जेव्हा चिमुकलीला पाहिलं तेव्हा ती रक्ताने माखलेली होती.
यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीच्या तीन नातेवाईकांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आमची टीम सध्या घटनेचा तपास करत आहे. मुलीची मेडिकल तपासणी करण्यात आली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिकारी सुरेश कुमार यांनी दिली आहे.