टीम, HELLO महाराष्ट्र। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अन्य सहा मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर जवळपास पंधरा दिवस हे मंत्री बिनखात्याचेच होते. अधिवेशनापूर्वी या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. या खातेवाटपात शिवसेनेचे पारडं भारी भरल्याचे पाहायला मिळाले. कारण गृह आणि नगरविकास ही दोन महत्वाची खाती शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती.
आता विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारात राष्ट्रवादीचे पारडे भारी भरणार आहे. कारण सध्या शिवसेनेच्या शिंदे यांच्याकडील गृह खाते राष्ट्रवादीच्या ववाट्याला जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इतर मंत्र्यांकडे असणाऱ्या नगरविकास आणि गृहनिर्माण यापैकी एक खातेही राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती समोर अली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे पारडे जड होणार हे नक्की.
दरम्यान, गृह खाते आपल्याकडेच राहावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही बोलले जात आहे. परंतु बार्गेनिंगमध्ये शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री पद जरी शिवसेनेकडे असलं तरी उपमुख्यामंत्री पदासह महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहेत.