त्नागिरी प्रतिनिधी । रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळं काही भांगात पावसाच्या हलक्या सरींसोबत जोरदार वारे वाहायला लागले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामूळ वातावरणात हा बदल झाला असून, येत्या दोन दिवसांत या वाऱ्यांचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. हे वादळ वायव्य दिशेने जाणार असल्याने कोकणच्या किनारपट्टीला त्याचा थेट फटका बसणार नाही असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, कोकण किनाऱ्यावर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाचे वारे वाहतील, असा इशारा सुद्धा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी संध्याकाळपासूनच परिणाम जाणवू लागला असून रात्रभर त्याचा प्रभाव टिकून होता.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम होते. आणखी सुमारे दोन ते तीन दिवस हे वातावरण कायम राहील, असेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आधीच अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होणार असलेल्या आंबा आणि काजूच्या हंगामावर या बदलत्या हवामानामुळे जास्त गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.