हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratnagiri Thiba Palace) कोकणाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र, नारळाची उंच उंच झाडी, काजू- आंब्याच्या बागा, शांत आणि लोभसवाण्या परिसराचे चित्र दिसू लागते. कोकणातील रत्नागिरी हा अत्यंत सुंदर जिल्हा म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीला लाभलेला निसर्ग हा पर्यटकांचे कायम लक्ष वेधून घेत असतो. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि वीर सावरकरांची कर्मभूमी म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरीतील समुद्र किनारा, बाजारपेठा ते ऐतिहासिक वस्तू प्रत्येकाची एक गोष्ट आहे. अशाच एक ऐतिहासिक वास्तूची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.
० थिबा पॅलेस (Ratnagiri Thiba Palace)
कोकणातील रत्नागिरी जिह्यात एक भव्य ब्रिटिशकालीन राजवाडा आहे. ब्रिटीश राजवटीत त्यांनी हा राजवाडा एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला होता. ब्रिटिशांनी बांधलेल्या या राजवाड्याचे नाव आहे ‘थिबा पॅलेस’. रत्नागिरी जिल्ह्याच्या अगदी जवळ स्थित असलेला हा राजवाडा ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावा आहे. हा राजवाडा पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. इथे ब्रिटिशांकडून नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या राजाचे नाव थिबा असे होते आणि त्याच्याच नावावरून या राजवाड्याचे नाव ‘थिबा पॅलेस’ असे ठेवण्यात आले.
० थिबा पॅलेसची रचना
ब्रिटिशांनी ब्रम्हदेशच्या (आत्ताचं म्यानमार) थिबा मिन नामक राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी (Ratnagiri Thiba Palace) ‘थिबा पॅलेस’ची निर्मिती केली होती. पुरातत्व विभागाच्या अभ्यासानुसार, हा राजवाडा १९१० मध्ये बांधण्यात आला आणि १९१६ पर्यंत राजा थिबा मिन व त्याची राणी इथे वास्तव्य करत होते. त्यामुळे आजही थिबा राजाच्या आणि राजवाड्याच्या अनेक आठवणी सांगितल्या जातात. इतकेच नव्हे तर, या राजवाड्यात थिबा राजाने आणि राणीने वापरलेल्या ऐतिहासिक वस्तूंचे जतन करत एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे. जे पहायला पर्यटक येत असतात.
० थिबा पॉईंट
थिबा पॅलेसची रचना हि तीन मजली असून त्याचे बांधकाम अत्यंत भक्कम आणि कोरीव आहे. राजवाड्याचा डौल आणि भव्यता अगदी कुणाचेही डोळे दिपतील अशी आहे. कौलारु छत, लाकडी खिडक्या आणि त्यावरील कोरीव काम फारच लक्षवेधी आहे. (Ratnagiri Thiba Palace) या राजवाड्याच्या संरचनेत पहिल्या मजल्यावर संगमरवरी मजल्याचे एक नृत्य कक्ष आहे. तर मागील बाजूस एक बुद्ध मूर्ती स्थापित केलेली दिसते. हि मूर्ती राजा थिबा यांनी भारतात आणली होती. या राजवाड्यातून जवळच असणारी सोमेश्वर नदी खाडी आणि भाट्येचा सुंदर असा समुद्र किनारा दिसतो. या मनमोहक दृश्यांना ‘थिबा पाईंट’ म्हणून ओळखले जाते. राजवाड्यातून दिसणारा हा थिबा पॉईंट सूर्यास्तासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
० थिबा पॅलेसला कसे जाल?
(Ratnagiri Thiba Palace) थिबा पॅलेसला जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरुन थेट रिक्षा करुन जाता येते. साधारण अर्ध्या तासाच्या अंतराचा हा प्रवास आहे. याशिवाय बसने प्रवास प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी रत्नागिरी बस स्थानकात उतरुन पुढे रिक्षाने प्रवास करावा. हा प्रवास साधारण १० ते १५ मिनिटांचा अपेक्षित आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत तुम्ही थिबा पॅलेसला भेट देऊ शकता. त्यानंतर जवळच असणाऱ्या भाट्ये समुद्र किनारा, पांढरा समुद्र, मांडवी बीच, रत्नदुर्ग तसेच मत्सालय या ठिकाणांना देखील तुम्ही भेट देऊ शकता.