काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? बसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राऊतांचा मोदींना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रविवारी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात शिवखोडी येथे भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात बस दरीत कोसळली ज्यामुळे दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या इतर जखमी झालेल्या भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. यासह जम्मू काश्मिरमधील पंडित पुन्हा घरी कधी येणार?? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “यापूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटना घडत होत्या. मोदी सरकार इतके बलवान ठरले की 370 हटवल्यानंतर जम्मू विभागात दहशतवादी हल्ले होऊ लागले जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. आजही जम्मू विभागातच एक हल्ला झाला ज्यात दहा जणांचा मृत्यू झाला. मोदी शपथ घेत होते त्यावेळी जम्मूमध्ये दहशतवादी रक्तरंजित खेळ खेळत होते. तसेच, “आजही काश्मीरी पंडित त्यांच्या घरी परत जाऊ शकत नाहीत. मोदीजी, पंडित घरी कधी परतणार?” असा सवाल राऊतांनी मोदींना विचारला आहे.

दरम्यान, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडत असतानाच दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात चालकाला गोळी लागल्यामुळे बस थेट जाऊन दरीत कोसळली. या घटनेमध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाला तर जवळपास 30 पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बसवर हल्ला ठीक 6:15 वाजेच्या सुमारास केला. ज्यावेळी बस भाविकांना घेऊन माता वैष्णोदेवी मंदिराकडे निघाली होती.