नाशिक : हॅलो महाराष्ट्र – गँगस्टर रवी पुजारी यास नाशिक कोर्टाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रवी पुजारी याच्यावर खंडणी आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. सन २०११ मध्ये पाथर्डी फाटा येथील एका बांधकाम साइट्सवर पुजारी टोळीतील चार आरोपींनी गोळीबार करून आपली दहशत निर्माण केली होती.
रवी पुजारीच्या टोळीने पाथर्डी फाटा भागातील एकता ग्रीन व्हॅली या बांधकाम साइटचे मालक अशोक मोहनानी यांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी तसेच मोहनानी यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी बांधकाम साइटवर गोळीबार केला. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली. रवी पुजारी हा परदेशातून मोहनानी यांना कॉल करून खंडणी मागत होता. हे सगळे कॉल्स रेकार्ड करण्यात आले आहे. आवाजाचे नमुने तपासणे, हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे कोठून आली, हल्ल्याच्या योजनेसाठी पैसे कसे उभे राहिले अशा विविध दहा ते बारा कारणांसाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने हि मागणी मान्य करत रवी पुजारीला २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास दोन टप्प्यात करण्यात आला. मात्र, तपासाची बाजू भक्कम राहिली. यामुळे या अगोदर अटक करण्यात आलेल्या आरोपींना कोर्टाने मोक्का कायद्यानुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आता या खटल्याचा दुसरा टप्पा सुरु आहे यामध्ये आरोपीला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
– अॅड. सुधीर कोतवाल, विशेष सरकारी वकील