हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संपत्तीवर आज सकाळी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. यावरून आता भाजपसह इतर नेत्यांकडून परब यांच्यावर निशाणा साधला जाऊ लागला आहे. दरम्यान आता आमदार रवी राणा यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “नवनीत राणा यांच्यासारख्या एका महिला खासदाराला अनिल परब यांनी जेलमध्ये टाकलं. मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब आज गजाआड जाईल, अशी घणाघाती टीका राणा यांनी केली आहे.
रवी राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा मंत्री मातोश्रीचा खजिनदार आहे. सचिन वाझेच्या माध्यमातून कलेक्शन जमा करून परब मातोश्रीवर पोहचवत होते. त्याचा आता या सगळ्याचा भांडाफोड होणार आहे. एस टी कर्मचाऱ्यांनी दिवाळी केली नाही त्यांची दिवाळी परबांमुळे अंधारात गेली. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे कारनामे लवकरच बाहेर निघतील”, असेही राणा म्हणाले.
विविध 7 ठिकाणी टाकले छापे….
अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.