कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात ऊसाची पहिली उचल एकरकमी एफआरपी एवढी द्यावी, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने 1 नोव्हेंबरला सैदापुरचा कृष्णा कनॉल ते तहसील कार्यालयापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रक्टर मोर्च्या काढणार आहे, अशी माहिती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी दिले.
मोर्चाचे निवेदन सचिन नलवडे व शेतकऱ्यांच्यावतीने नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी ऊसाची पहिली उचल ही एकरकमी एफआरपी एवढी मिळावी. यासाठी रयत क्रांती संघटनेने गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. त्याला चांगला पाठिंबा मिळाला आहे. बैठकीत एकरकमी एफआरपीचे ठराव करण्यात आले आहेत. सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर 40 रुपये किलो असून उसापासून मळी, बगॉस, मॉलीसीस, अल्कोहल, विज निर्मिती, इथोनॉल असे उपपदार्थ तयार होतात.
त्यातून साखर कारखान्याना चांगले उत्पन्न मिळते. जिल्ह्यातील कारखान्यांचा उतारा पाहता शेतकऱ्यांच्या उसाला 3300 रुपये प्रति टन दर दिला पाहिजे. त्यातील पहिला हप्ता हा एकरकमी एफआरपीचा असला पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी टॅक्टर रॅली काढण्यात येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शेतकऱ्यांनी पक्ष, गटतट, संघटना विसरुन मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सचिन नलवडे यांनी केले आहे.