Wednesday, June 7, 2023

RBI ने बँक ग्राहकांसाठी KYC ची अंतिम मुदत वाढवली, त्याविषयीचे डिटेल्स तपासा

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी बँकांमधील KYC अपडेटची अंतिम मुदत तीन महिन्यांनी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सेंट्रल बँकेने अपडेट करण्याची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. KYC अपडेट करण्यासाठी ग्राहक ई-मेल किंवा पोस्टद्वारे कागदपत्रे पाठवू शकतात. त्यांना कागदपत्रे घेऊन शाखेत जाण्याची गरज नाही. याशिवाय ग्राहक व्हिडिओ KYC देखील करू शकतात.

मे महिन्यात, देशात कोविड-19 ची दुसरी लाट आणि विविध राज्यांमध्ये लादलेल्या निर्बंधांमुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँका आणि इतर नियमन केलेल्या वित्तीय संस्थांना डिसेंबर 2021 पर्यंत ग्राहकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिले.

KYC न केल्यास काय होईल?
बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकाला नवीन KYC कागदपत्रे बँकेत जाऊन किंवा ऑनलाइन अपडेट करून पूर्ण करावी लागतील. बँकेचे म्हणणे आहे की केवायसी पूर्ण न केल्यास खात्यातील भविष्यातील ट्रान्सझॅक्शन थांबवले जाऊ शकतात.

RBI च्या KYC नियमांबाबत नियम
कोणत्याही बँकेत खाते उघडण्यासाठी KYC आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेने हे बंधनकारक केले आहे. KYC हा ग्राहक ओळखण्याचा एक मार्ग आहे, ज्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. सबमिट केलेल्या कागदपत्रांना KYC डॉक्युमेंट्स म्हणतात.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर RBI ने नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की,”सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर KYC नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.” या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत KYC अपडेट न केल्यामुळे बँका कोणत्याही खात्यातून ट्रान्सझॅक्शन थांबवू शकणार नाहीत.