हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने उच्चांक गाठला असतानाच आता सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रेपो रेट मध्ये ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून आता रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
यापूर्वी मे महिन्यात रेपो रेट मध्ये अनपेक्षितपणे 40-बेसिस पॉईंट्स आणि जूनमध्ये 50 बेसिस पॉइंट्स वाढ केल्यानंतर आरबीआयने केलेली ही तिसरी वाढ आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने तुमच्या गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे.
RBI hikes repo rate by 50 basis points to 5.4% with immediate effect pic.twitter.com/axs5EMdvIM
— ANI (@ANI) August 5, 2022
रेपो रेट म्हणजे काय –
रेपो रेटला प्राइम व्याजदर असेही म्हणतात. रेपो रेट म्हणजे ज्या दराने व्यावसायिक बँका RBI कडून पैसे घेतात. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, आणि रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचा सरळ अर्थ असा की रेपो रेट वाढल्यावर गृहकर्ज, कार लोन आणि वैयक्तिक कर्ज यांसारखी कर्जे महाग होतात. याशिवाय ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर दिले जाणारे व्याजही मोठ्या प्रमाणावर रेपो दराने ठरवले जाते. म्हणजेच जेव्हा रेपो रेट मध्ये वाढ होते तेव्हा बँका एफडीवरील व्याजदर वाढवतात.