नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाराष्ट्राच्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. ही बँक आता ग्राहकांना आपली सेवा देऊ शकणार नाही. “परिणामी, बँक 03 फेब्रुवारी 2022 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून बँकिंग व्यवसाय करणे बंद करेल असे RBI ने एका निवेदनात म्हटले आहे. RBI ने गुरुवारी हा आदेश दिला.
RBI ने आपल्या आदेशात म्हटले आहे की, बँकेची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीही त्यावर काही निर्बंध लादले होते. त्या निर्णयामुळे ग्राहकांना 6 महिने पैसे काढता आले नाहीत. मात्र तरीही बँकेच्या व्यावसायिक स्थितीत सुधारणा न झाल्याने आता लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि भविष्यात आणखी कमाई होण्याची शक्यताही नाही, असे RBI ने आपल्या निर्णयात म्हटले आहे. अशा स्थितीत लायसन्स रद्द करणे हे ग्राहकांच्या हिताचे आहे.
नियमानुसार ग्राहकांना पैसे मिळतील
महाराष्ट्रातील नाशिक शहरात असलेल्या इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द करताना, RBI ने संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवले आहे. बँकेने नियमानुसार ग्राहकांचे डिपॉझिट्स परत करण्याबाबत पावले उचलण्यास सांगितले आहे.
RBI च्या आदेशानुसार, बँकेच्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट्स परत केले जातील. बँकेच्या आकडेवारीनुसार, येथे 99% खातेधारकांना त्यांची संपूर्ण रक्कम मिळण्याचा हक्क आहे, म्हणजेच त्यांच्या बँक खात्यात 5 लाख किंवा त्याहून कमी रक्कम जमा आहे. अशा परिस्थितीत बँक लायसन्स रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका फक्त 1 टक्के ग्राहकांनाच बसणार आहे.
फक्त 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळेल
जर बँक बुडली तर ग्राहकांना जास्तीत जास्त 5 लाख रुपये परत मिळू शकतात. यापेक्षा जास्त रक्कम मिळू शकत नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट कॉर्पोरेशन (DICGC) च्या नियमांनुसार, प्रत्येक ग्राहकाचा 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्स साठी इन्शुरन्स काढला जातो. बँकेने RBI ला दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2022 पर्यंत बँकेने ग्राहकांना 2.36 कोटी रुपये परत केले आहेत.