खुन्नस देणाऱ्या विराटला सुर्यकुमारने दिले त्याच भाषेत प्रत्युत्तर ; विराटच वागणं अशोभनीय

Suryakumar and virat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल२०२० मध्ये काल गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये रोमांचक सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव आणि बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये खुन्नस पाहायला मिळाली. या सामन्यात मुबंईच्या विजयात सुर्यकुमारने महत्त्वाचा वाटा उचलला. मुंबईकडून १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ४३ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७९ धावा केल्या. एकावेळी मुंबई ७२ धावांवर ३ बाद अशा अवस्थेत असताना त्याने शेवटपर्यंत टिकून मुंबईला विजय मिळवून दिला.

याच दरम्यान तो १३ व्या षटकात ४० धावांवर फलंदाजी करत असताना विराट आणि त्याच्यामध्ये खुन्नस पहायला मिळाली. डेल स्टेनने टाकलेल्या या षटकातील ५ व्या चेंडूवर सुर्यकुमारने चौकार ठोकला होता. तर शेवटच्या चेंडूवर सुर्यकुमारने कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. यावेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने तो चेंडू लगेचच पकडला. त्यामुळे सुर्यकुमारला धाव घेता आली नाही. मात्र विराटने चेंडू पकडल्यानंतर तो सुर्यकुमार यादवच्या दिशेने चालत येत असलेला दिसला.

https://twitter.com/gandharv/status/1321510975216910336?s=20

यावेळी विराट सुर्यकुमारकडे भेदक नजरेने पाहात असल्याचेही दिसले. त्यावर सुर्यकुमारनेही विराटवरील नजर हाटवली नाही. त्यानेही त्याच्याकडे नजर रोखून ठेवली. यानंतर विराट सुर्यकुमारच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्यानंतर लगेचच सुर्यकुमार तिथून काहीही न बोलता निघून गेला.

२६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली.  या दौऱ्यासाठी भारतीय संघात सुर्यकुमारची निवड होईल, असे अनेकांना अपेक्षित होते. मात्र त्याची एकाही भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे अनेक दिग्गजांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांनाही सुर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न केल्याने विराटवर निशाणा साधला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’