गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक
१ मे रोजी झालेल्या जांभूळखेडा येथील भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाल्याप्रकरणी आणि दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ या दोन्ही घटनांप्रकरणी जहाल नक्षलवादी कमांडर तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर व त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात देशद्रोह आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ एप्रिलच्या चकमकीत भास्करची पत्नी रामको ठार झाली होती . यामुळे संतापाच्या भरात त्याने हा भूसुरुंगस्फोटाचा कट रचला असावा, अशी चर्चा सध्या सुरु आहे. नक्षलवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांची जाळपोळ केली होती.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर सकाळी ११ वाजता कुरखेडा येथून शीघ्रकृती पथक घटनास्थळाच्या दिशेने निघाले असता जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या नक्षली हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे.