सातारा | पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणार्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 223 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण विक्रमी 347 अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी आ. मकरंद पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, मदनदादा भोसले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. आ. महेश शिंदे यांच्या समर्थकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ‘किसनवीर’चा राजकीय फड चांगलाच तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आ. मकरंद आबांनी सोसायटी गटातून, नितीनकाकांनी कवठे गटातून तर मदनदादा भोसले यांनी भुईंज गटातून अर्ज दाखल केले आहेत. यानिमित्त दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भोसले विरूध्द पाटील असा संघर्ष पहायला मिळणार आहे. वाई, खंडाळा, जावली, सातारा, कोरेगाव अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. भोसले विरुद्ध पाटील यांच्यातील राजकीय वैर अनेक दशकांपासून सुरु आहे. निवडणूक कोणतीही असो यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचतो. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा कृष्णाकाठी सत्तासंघर्ष पहायला मिळणार आहे. अडीच वर्षापूर्वी विधानसभेच्या निमित्ताने भोसले विरुद्ध पाटील यांच्यातील संघर्ष मतदार संघातील जनतेने अनुभवला होता. ‘किसनवीर’ चा अखाडा मात्र तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा गाजणार आहे.
शुक्रवारी भुईंज गटातून 58, वाई- बावधान-जावलीमधून 30, खंडाळा- कवठे गटातून 49, सातारा गटातून 57, कोरेगाव गटातून 70 तसेच अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ 18 महिला राखीव 21, इतर मागास प्रवर्ग 16, विशेष मगास प्रवर्ग 13, उत्पादक संस्था., बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थामधून एकूण 6 अर्ज दाखल आहेत. 21 जागांसाठी विक्रमी 347 इतके अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी सोमवार, द. 4 एप्रिल रोजी होेणार आहे.