औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आगळ्यावेगळे आदेश काढून लसीकरण वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे लसीकरण मोहिमेला जिल्ह्यातील गावागावातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून काल दिवसभरात 47 हजार 799 नागरिकांनी लस घेतली. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी राज्यात 31 व्या क्रमांकावर असलेला जिल्हा थेट 18 व्या स्थानी पोहोचल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी दिली आहे.
दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी होती. ही बाब गांभीर्याने घेत निलेश गटणे यांनी दिवाळीनंतर सर्व अधिकाऱ्यांना तालुके दत्तक देत लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी परिचारिका आरोग्य सेवक यांच्या मदतीला अंगणवाडी सेवक, ग्रामसेवक तलाठी आणि अंगणवाडी कर्मचार्यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर लसीकरणाला वेगाला यासोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना या कामात उतरवण्यात आले. 40 ते 25 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण असलेली गावे निवडण्यात आली त्या गावात सकाळी आणि सायंकाळी नंतर लसीकरण कॅम्प लावण्यात येत आहेत.
एवढेच नव्हे तर वाड्या आणि वस्त्यांवर आरोग्य कर्मचारी जाऊन लसीकरण करत आहेत. तसेच वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे अंथरुणावर खिळून असलेल्या व्यक्तींना घरी जाऊन लसीकरण केले जात असल्याचे निलेश गटणे यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत काल जिल्ह्याभरात 47 हजार 799 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे काल पर्यंत जिल्ह्यातील 79.93 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.