हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या मुंबईच्या पोलीस (Mumbai Police) विभागात मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे नवी पोलीस भरती होण्यापूर्वी मुंबई पोलीस विभागात तीन हजार कंत्राटी पदे (Contract Method) भरली जाणार आहेत. या कंत्राटी पोलिसांना वेतन देण्यासाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवले जाणार आहेत. ही कंत्राटी पोलिसांची भरती 3 हजार पदांसाठी करण्यात असून त्याचा कार्यकाळात जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी असणार आहे. मुंबई पोलीस दलात 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्यासाठी गृह खात्याने मंजूरी दिल्यामुळे अनेक तरुणांच्या हाती रोजगार येणार आहे.
3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती
मुंबई पोलिसांच्या कामाचा दिवसेंदिवस व्याप वाढत चालला आहे. त्यामुळे आता विभागात मनुष्यबळाची तीव्र टंचाई ही जाणवू लागली आहे. यावर पर्याय म्हणून मुंबई पोलीस नवीन भरती होईपर्यंत कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात यावी अशी विनंती पोलीस आयुक्तांकडून गृह विभागाकडे करण्यात आली होती. याच विनंतीचा विचार करून गृह विभागाने मुंबई पोलीस दलात 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्यासाठी मंजूरी दिली आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. या पोलिसांना पगार देण्यासाठी सरकारकडून 30 कोटी रुपये खर्चासाठी देखील मंजुरी मिळाली आहे.
11 महिन्यांसाठी भरती
राज्य शासनाच्या गृह विभागाने कंत्राटी पदे भरण्यासाठी मंजुरी दिल्यामुळे 3 हजार तरुणांच्या हाती रोजगार येणार आहे. तसेच यामुळे अनेक तरुणांचे मुंबई पोलीस खात्यात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. परंतु ही भरती प्रक्रिया केवळ 11 महिन्यांसाठी असणार आहे ही बाब देखील तरुणांनी लक्षात घेणे गरजेची आहे. अद्याप, ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाईल? यासाठी अर्ज कसा भरावा लागेल? याविषयी कोणतीही माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आलेली नाही. मात्र दिवाळीच्या कामाचा व्याप वाढण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, सणासुदीच्या काळात विशेषतः गणेशोत्सव नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी या सणांवेळी मुंबईत बंदोबस्तासाठी, अतिरिक्त पोलिसांची आवश्यकता भासते. आता थोड्या दिवसांवरच दिवाळीचा सण आला आहे. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या कामाचा व्याप देखील तितकाच वाढेल. या पार्श्वभूमीवरच 11 महिन्यांसाठी कंत्राटी पोलीसांची भरती करण्यात येणार आहे.